दिवसामागूनि दिवस चालले, ऋतू मागूनी ऋतू
जिवलगा, कधि रे येशील तू ?
धरेस भिजवून गेल्या धारा
फुलून जाईचा सुके फुलोरा
नभ धरणीसी जोडून गेले सप्तरंग सेतू !
शारदशोभा आली, गेली
रजनीगंधा फुलली, सुकली
चंद्रकलेसम वाढुन विरले अंतरीचे हेतू !
हेमंती तर नुरली हिरवळ
शिशिर करी या शरिरा दुर्बळ
पुन्हा वसंती डोलू लागे प्रेमांकित केतू !
पुनरपि ग्रीष्मी तीच काहीली
मेघावली नभि पुनरपि आली
पुनश्च वर्षा लागे अमृत विरहावर ओतू !
गीतकार: ग.दि. माडगूळकर
संगीतकार: सुधीर फडके
गायिका: आशा भोसले
चित्रपट: सुवासिनी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा