ह्या गीताला सगळ्यात आधी चाल लावली होती ती दशरथ पुजारी ह्यांनी आणि त्यांनीच त्यांच्या सुमधुर आवाजात हे गीत गायले होते. चालही खूप छान होती....पुढे श्रीनिवास खळे ह्यांनीही एक सुंदरशी चाल ह्या गीताला लावली आणि तेवढ्याच छान पद्धतीने सुरेश वाडकरांनी ती गायलेय....हल्ली दशरथ पुजारी ह्यांचे ते गीत कुठेच ऐकायला मिळत नाहीये...महाजालावर शोध घेऊनही ते मला सापडले नाही....त्यांनी लावलेल्या चालीतील फक्त पहिल्या ओळीचीच चाल मला आठवतेय..खूप प्रयत्न करूनही पुढची चाल मात्र आठवेना..म्हणून मग मी माझ्याच पद्धतीने हे गीत ’चाल’वण्याचे ठरवले....पहिल्या ओळीची चाल मात्र पुजारीसाहेबांचीच आहे.
जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा
माझा न राहतो मी हरवून हा किनारा
आभाळ भाळ होते, होती बटाहि पक्षी
ओढून जीव घेते पदरावरील नक्षी
लाटांस अंतरीच्या नाही मुळी निवारा
डोळे मिटून घेतो छळ हा तरी चुकेना
ही वेल चांदण्याची ओठांवरी झुकेना
देशील का कधी तू थोडा तरी इशारा ?
नशिबास हा फुलांचा का सांग वास येतो
हासून पाहिल्याचा नुसताच भास होतो
केव्हा तुझ्या खुशीचा उगवेल सांग तारा ?
कवी: मंगेश पाडगांवकर
’चाल’क आणि गायक: प्रमोद देव
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा